चौकशीकरिता कामगार विभागाची टीम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

चंद्रपूर:वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील 500 कंत्राटी कामगारांना 7 महिन्यांच्या थकीत पगार तसेच किमान वेतन देण्यात यावे या मागणीसाठी जनविकास कामगार संघाने डेरा आंदोलना सोबत सुरू केलेल्या ‘कलम-कानून-कागज लेकर हल्लाबोल’ या आंदोलनाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. उद्योग उर्जा व कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन पाटणकर यांच्याकडे यापूर्वीच जन विकास कामगार संघाने थकित पगार व किमान वेतना बाबत तक्रार केली होती . 28 फेब्रुवारी पर्यंत कामगार विभागातर्फे वैद्यकीय महाविद्यालयाला वेळ देण्यात आली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाने कामगारांचे पगार त्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळे जनविकास कामगार सघांने कामगार विभागाकडे कारवाईसाठी दबाव वाढविल्यानंतर आज दिनांक 3 मार्च रोजी सरकारी कामगार अधिकारी छाया नांदे तसेच निरीक्षक माधव बारई यांच्या चमूने वैद्यकीय महाविद्यालयात धाड टाकून कामगारांच्या वेतनाबाबत सर्व कागदपत्रांची तपासणी केली. शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतनानुसार पगार व भत्ते देण्यामध्ये त्रुटी आढळल्यास वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला सात दिवसांचा अवधी देण्यात येईल. या अवधीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास त्यांचे विरुद्ध कामगार विभागातर्फे न्यायालयात फौजदारी कारवाई करण्यात येईल.त्यासाठी शासनाची परवानगी सुद्धा कामगार विभागाला मिळालेली आहे.

दरम्यान कामगारांच्या डेरा आंदोलनाला काँग्रेसच्या चंद्रपूर शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर,ओबीसी सेलचे मोहन डोंगरे,एनएसयुआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, पप्पू सिद्दीकी यांनी डेरा आंदोलनाला भेट देऊन जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार,खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर व शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक सुभाष कासमगोट्टूवार यांचेसह मुक्ती फाऊंडेशन च्या अध्यक्षा मंजुश्री कासमगोट्टूवार, सचिव प्रज्ञा गंधेवार, मनिषा मामीडवार, दिक्षा सुर्यवंशी,अनुपा मत्ते, साधना दुरडकर,मालावती चक्रवती,मंजु पडगेलवार, निर्मला ईटनकर, अनिता ईटनकर,‌वंदना ईटनकर, वैशाली वंजारी, अनिता दाते,मराठी बाणा संस्थेचे अध्यक्ष रामजी हरणे यांच्या शिष्टमंडळाने सुद्धा आंदोलनाला भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here