सीताराम कुंटे यांनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार

मुंबई, दि. 28: राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर मावळते मुख्य सचिव संजय कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. कुंटे यांनी श्री. संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध विभागांच्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील १९८५ च्या तुकडीचे असलेले श्री. कुंटे मूळचे सांगली येथील असून एम.ए (अर्थशास्त्र) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. १९८६ मध्ये जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. कुंटे यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी धुळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे म्हणून त्यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here