‘ब्रांडिंग’साठी चंद्रपूर मनपाने काढलेल्या ‘त्या’ निविदेवर नगरसेवक पप्पू देशमुख यांचा आक्षेप

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेने स्वतःच्या प्रसिध्दी(ब्रॅडिंग) करिता वर्षाला २५ ते ३० लक्ष रुपये खर्चाची निविदा काढली.कोरोना आपत्तीमुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झालेली असल्यामुळे मनपाने अनेक खर्चामध्ये कपात केलेली आहे.कोरोनाच्या आपत्तीचा सामना करतांना मोठा निधी खर्च झाल्यामुळे विकास कामासाठी निधीची कमतरता असल्याचे मनपातील सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र महानगर पालिकेने काढलेल्या एका निविदेमुळे मनपातील सत्ताधार्‍यांच्या बोलण्यात व कृतीमध्ये फरक असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी मनपाने स्वतःचे ब्रँडिंग करण्यासाठी एक निविदा प्रसिद्ध केली. महानगरपालिकेची कामे,प्रयत्न, निधी,सेवा यांची माहिती प्रभावीपणे समाजस्तरावर पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया,वृत्तपत्रे,वृत्तवाहिन्या,न्यूज पोर्टल,मोबाईल या साधनांचा वापर करून एका समर्पित टीम च्या माध्यमातून ‘मिडिया ब्रँडिंग’ करण्याच्या कामासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे.
आज झालेल्या आमसभेत नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या निविदेवर आक्षेप घेतला.सध्या युधिष्ठीर रईच हे जनसंपर्क अधिकारी मनपा मध्ये कार्यरत आहेत. प्रसिद्धीचा सर्व भाग त्यांच्या एकट्यावर आल्याने त्यांच्या जोडीला एक टीम देण्याच्या हेतूने ही निविदा काढण्यात आल्याचे दर्शविण्यात येत आहे. मात्र कंत्राटी पध्दतीने दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वार्षिक तीन ते चार लक्ष रुपये खर्चामध्ये प्रसिद्धीचे काम करणे शक्य आहे.मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना केवळ प्रसिध्दी करिता २५ ते ३० लक्ष रुपये वार्षिक खर्च करणे अनावश्यक आहे.तसेच केवळ एखाद्या विशिष्ट कंत्राटदाराचे हित जोपासण्यासाठी अशा प्रकारच्या निविदा काढण्याची व जनतेच्या पैशाला चुना लावण्याची सत्ताधाऱ्यांना सवय पडलेली असल्याचा आरोप सुध्दा देशमुख यांनी केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here