निवासी शाळेत शिकणाऱ्या 229 विद्यार्थ्यांसह 4 शिक्षकांना कोरोनाची लागण

वाशिम:रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल , २४ फेब्रुवारी रोजी तातडीने या निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शंकर वाघ यांच्यासह शिक्षक, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. बाधित विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, त्यांची आरोग्यविषयक सद्यस्थिती, आढळलेली लक्षणे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती घेतली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने २४ तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. या पथकाने ठराविक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तपामान, ऑक्सिजन पातळी तसेच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक २४ तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी रोज सकाळी शाळेला भेट देवून सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, वाशिम जिल्ह्यातील ११, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here