सिद्धबली इस्पात लिमी. च्या मालकांवर गुन्हा दाखल करा

चंद्रपूर: चंद्रपूर ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात लिमी उद्योगांत एका मध्य प्रदेश निवासी शैलेंद्र नामदेव नामक कामगाराचा अपघाती मृत्यू झाला मात्र कंपनी व्यवस्थापनाने प्रकरण दाबण्याचा मानसिकतेतून मृत शरीर परस्पर नागपूरला हलविले त्यांच्या या दुष्कृत्याचे बिंग फुटल्यानंतर उद्योग मालकाने पोलीस विभागाला खोटी माहिती देत सदर कामगार जखमी झाल्याची खोटी माहिती दिली. उद्योग मालकाच्या सूचनेवरून उद्योग व्यवस्थापनाने कामगाराच्या जीवाशी खेळ खेळला असून मालकांच्या चुकीमुळे या कामगाराचा मृत्यू झाला असल्याने उद्योग मालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत मोका चौकशी करण्यासाठी हंसराज अहीर यांनी थेट सिद्धबली इस्पात येथील घटनास्थळ गाठले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नांदेडकर, क्षेत्र पोलीस निरीक्षक कासार, येरुर चे सरपंच मनोज आमटे, सोनेगाव सरपंच संजय उकीनकर, पडोली ग्राम पंचायत सदस्य विक्की लाडसे, सिद्धबली इस्पात चे अधिकारी उपस्थित होते. कामगार हा मृत झाल्यानंतरही पोलीस विभागाला याची माहिती न देता मृत शरीर जागेवरून हलविणे हा एक प्रकारे अक्षम्य गुन्हा आहे व प्रकरण दाबून मृत कामगाराच्या आश्रितांना मोबदला न देण्याच्या क्रूर मानसिकतेतून हा सर्व प्रकार उद्योगाच्या मालकाकडून करण्यात आल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी यावेळी केला.
उद्योग व्यवस्थापनाच्या मते तो कामगार जर जखमी होता तर त्याला लगेच चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी का आणले नाही आणि जर का तो जागीच मृत झाला तर त्याचे मृत शरीर उद्योग व्यवस्थापन का हलवावे या प्रश्नाने अहीर यांनी उद्योग व्यवस्थापनाला धारेवर धरले. उद्योग व्यवस्थापनापुढे मानवी जीवनाची काहीही किंमत नसून त्यांना आपला स्वार्थ या कामगारांकडून सिद्ध करायचा स्पष्ट मानस आहे व त्यांच्या या कृतघ्न व विकृत मानसिकतेचा निषेध यावेळी अहीर यांनी केला.
उद्योगात साधं सुरक्षा अधिकारी सुद्धा नसून मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज सुद्धा नाही अशी हुकूमशाही परिस्थिती या उद्योगात असून या प्रकरणाची आपण तक्रार करणार असल्याची माहिती यावेळी अहीर यांनी दिली. सिद्धबली इस्पात चे व्यवस्थापन बदल झाला मात्र या उद्योगातही पूर्वीच्या कामगारांच्या हातचे काम या व्यवस्थापनाने हिसकावले असल्याने या सर्व कामगारांना पूर्ववत कामगारांना न्याय देत काम देण्याचा इशारा हंसराज अहीर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संचालकांना दिला.
उद्योगाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नजीकच्या गावांना याचा फटका बसून शेतकऱ्यांची शेती व गावकरी बाधित होत असतांनाही येथे या गांवातील अथवा स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात येत नसून व या उद्योगात मागे झालेल्या अपघातात मृत व काल झालेला मृत हे सर्व परप्रांतीय असल्याने स्थानिकांचा रोजगार डावलल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले असतांना त्वरित स्थानिकांना रोजगार देण्याच्या सूचना यावेळी अहीर यांनी केल्या.
मानवी दृष्टिकोन ठेवून मृत कामगाराच्या परिवाराला तात्काळ आर्थिक सहायता देत एकाला त्वरित रोजगार द्यावा. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, परप्रांतीय लोकांना रोजगार देतांना त्यांचे पोलीस सत्यापन प्रमाणपत्र क्षेत्राच्या पोलीस ठाण्यात जमा करावे, प्रदूषणाचा फटका नजीकच्या गावकऱ्यांना बसू नये याकरिता नियमावलीचे पालन करावे अशा सर्व सूचना हंसराज अहीर यांनी केल्या. सिद्धबली इस्पात लिमी च्या चुकीमुळे व हेकेखोर भूमिके विरोधात आपण संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रार करणार असल्याचे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here