

चंद्रपूर: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासन लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करीत आहेत अशा परिस्थीती चंद्रपूर जिल्हयातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूका सहा महिने पूढे ढकलाव्या अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत वरील मागणीसंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान देवराव भोंगळे यांनी मागणी संदर्भात आपली भूमीका विशद केली. दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला संबोधित केले. राजकीय, धार्मीक, सामाजिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याची भूमीका जाहीर करत जनतेने खबरदारी न घेतल्यास लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चंद्रपूर जिल्हयात सुध्दा अनेक निर्बंध लागू करण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हयात चिमूर नगर परिषद, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, या नगर पंचायतीच्या सार्वत्रीत निवडणूका तर जिल्हा परिषदेच्या दोन जागेसाठी व पंचायत समित्यांच्या चार जागांसाठी व बल्लारपूर नगर परिषदेच्या 2 जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी मतदान यादीची कामे सुध्दा पूर्ण झाली आहेत. या निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोना पुन्हा डोके वर काढायला लागला आहे. अशा परिस्थीती या निवडणूका घेणे योग्य होणार नाही, म्हणून या निवडणूकी सहा महिने पुढे ढकलाव्या अशी मागणी देवराव भोंगळे यांनी यावेळी केली.