कोरोना नियंत्रणासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या कठोर उपाययोजना

चंद्रपूर दि. 20:जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या नियंत्रित राहावी, नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी मर्यादित उपस्थिती इ. कोरोनाचे नियम पाळावे म्हणून जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या गैरजबाबदार नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी आता दररोज विवाहसोहळे, मंगल कार्यालय, जिमखाना, नाईटक्लब, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, सर्व धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने आणि गार्डन्स, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल्स तसेच खाजगी कार्यालयात नियमित तपासणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापना व व्यवस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आता ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त राजेश मोहिते यांच्या देखरेखीखाली तपासणी पथके तयार केली असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्राम विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांना आपापल्या क्षेत्रात दररोज तपासणी करण्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर, घरात जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्क नसल्यास 500 रुपये दंड तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे, अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यापुर्वीच निर्गमित केले आहेत.

लग्न व इतर तत्सम कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींची मर्यादा असून इतर सभा, बैठका, सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात संबंधित बंदिस्त सभागृह व मोकळ्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के अथवा 100 व्यक्ती यापैकी जे कमी असेल ती मर्यादा ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी बंधनकारक केली आहे.

उपस्थिती मर्यादा व कोरोनाचे नियम न पाळल्यास संबंधित सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागा यांचे मालक अथवा व्यवस्थापक यांचेवर रु. 5 हजार दंड आकारण्यात येईल. सदर आदेशाचे दुसऱ्यांचा उल्लघन झाल्यास रु. 10 हजार व तिसऱ्यांदा रु. 20 हजार, याप्रमाणे दंड आकारण्यात येईल. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार सदर सभागृह, मंगल कार्यालय अथवा जागा सिल करणे व गुन्हा दाखल करणे यासारखी कारवाई देखील करण्यात येईल. तसेच कार्यक्रमाचे आयोजक हे सुध्दा सदर उल्लंघनासाठी रु. 10 हजार इतक्या दंडास पात्र राहतील.

जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहे. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग, वारंवार हात स्वच्छ धूणे, गर्दी टाळणे इ. शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे सक्तिने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here