कोविड योद्ध्यांची छत्रपतींच्या प्रतिमेसमोर सामुहीक प्रतिज्ञा…

चंद्रपूर: वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना ७ महिन्यांचा थकित पगार तसेच किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात डेरा आंदोलन सुरु आहे.या आंदोलनाच्या ठिकाणी आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे.अजुन पर्यंत आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातून आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुध्दा मिळत आहे. सर्व आंदोलनकर्ते कामगार मुला-बाळांसह याठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. इथेच चुलीवर स्वयंपाक करून जेवण करणे,झोपणे व सर्व दिनचर्या करणे असा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.मागील अकरा दिवसांपासून मंडपात झोपताना कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.रात्री झोपताना डासांचा त्रास असल्यामुळे कामगारांची झोप व्यवस्थित होत नाही.गर्दीमुळे मंडपामध्ये कामगारांना झोपण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा मिळत नाही.पुरुष कामगारांना तर रात्री मंडपासमोर हिरवी मॅट टाकून खाली झोपावे लागते. पोलिसांच्या बॅरिकेट ने एका बाजूचा रस्ता बंद करून सर्व पुरुष कामगार खाली झोपतात.थंडी व दवबिंदूमुळे सकाळी कामगारांचे ब्लॅकेट ओलसर झालेले असतात. मात्र अशाही बिकट परिस्थितीत कामगारांचा आत्मविश्वास जराही ढळलेला दिसत नाही.

आज शिवजयंती निमित्त सर्व आंदोलनकर्त्या कोविड योध्द्यांनी पुन्हा एकदा आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आंदोलनाच्या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे समोर उभे राहून व हात समोर करून सर्व महिला-पुरुष कामगारांनी प्रतिज्ञा घेतली.’जोपर्यंत कामगारांचे थकीत पगार व किमान वेतन मिळणार नाही, तोपर्यंत डेरा आंदोलनातून एकही कामगार हटणार नाही’,अशा प्रकारची प्रतिज्ञा कामगारांनी या ठिकाणी घेतली. बाराव्या दिवशी शासन व प्रशासन स्तरावर कोणताही निर्णय झालेला नसताना तसेच थंड वातावरण व अव्यवस्थेमुळे परिस्थिती बिकट असतानाही कामगारांचा निर्धार मात्र ठाम असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञेतून दिसले. त्यामुळे डेरा आंदोलन पुढे किती दिवस चालणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here