दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सकाळ पाळीत घ्या

चंद्रपूर : कोरोनामुळे या वर्षी शैक्षणिक वर्षाला बरीच उशिरा सुरुवात झाली आणि त्याच मुळे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा एप्रिल आणि मे महिण्यात घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केलाय. मात्र मे महिण्यात ४७ अंश तापमान असणाऱ्या विदर्भात परीक्षा घेण्यास अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध दर्शविला असून ८ ते ११ वाजता सकाळ पाळीत ही परीक्षा घेण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
मुलांच्या जीवनात अतिशय महत्वाचा शैक्षणिक टप्पा म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आहे. कोरोनामुळे या वर्षी मुलांचं निम्मं शैक्षणीक वर्ष वाया गेलं आणि आत्ता कुठे अभ्यासाची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली आहे. त्यातच परवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आणि इकडे विदर्भातील पालकांना भर हिवाळ्यात घाम फुटला आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या प्रमाणे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते २२ एप्रिल आणि लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे पर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते २८ एप्रिल आणि लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे पर्यंत घेण्यात येईल. राज्यातील इतर भागात या दिवसात तापमान ४० अंशांच्या घरात राहते मात्र विदर्भात या दरम्यान दररोजचं तापमान ४५ ते ४७ अंशांच्या घरात असते. मग अशा लाही-लाही करणाऱ्या गर्मीत विद्यार्थी परीक्षा देणार तरी कशी? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ८ ते ११ वाजता सकाळ पाळीत ही परीक्षा घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here