‘बर्ड फ्ल्यू’ बाबत यंत्रणांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी गुल्हाने

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्ल्यू’ चे निदान झालेले नाही. मात्र स्थलांतरीत पक्षी, पाणथळे, तलाव येथे तसेच पोल्ट्री फार्म येथे यंत्रणांनी पाळत ठेवून सतर्क राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पशुसंवर्धन तसेच जलसंधारण विभागाला दिले आहे.
देशात आढळलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अे.एन.सोमनाथे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिमित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात राज्यस्तर व स्थानिकस्तर असे एकुण 162 पशुवैद्यकिय संस्था असुन त्यांचे माध्यमातुन सर्व्हेक्षणाचे काम सुरु झालेले आहे. रोगाचा शिरकाव झाल्यास दक्षता म्हणून प्रत्येकी 3 अधिकारी / कर्मचारी समाविष्ट असलेले एकुण 22 शीघ्र कृती दल (Rapid Response Team) तयार करण्यात आलेले आहे. आपल्याकडे आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पुर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तर कोंबडी विक्रेत्यांनी आपल्या ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढविणेस मदत होणेकरीता कोंबडया कापल्या जातात तेथे मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
बर्ड फ्ल्यु संदर्भात सर्वसामान्य जनता तसेच सर्व पोल्ट्रीधारक यांना कळविण्यात येते की, जिल्हयातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये अचानक व जास्त मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच चंद्रपुर बर्ड फल्यु कंट्रोल रुम जिल्हा समन्वयक दुरध्वनी क्र. डॉ. पी. डी. कडुकर -9822898207, डॉ. विनोद रामटेके 9423394108 व संदिप राठोड -8805036331 यावर त्वरीत संपर्क करुन त्याची माहिती दयावी. बर्ड फल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत .

बर्ड फल्यु बाबत सदयस्थिती –
जागतिक आरोग्य संघटना यांचेनुसार एव्हिएन इन्फल्युएंन्झा (बर्ड फ्ल्यु ) हा कुक्कुट पक्षांना विषाणुमुळे होणारा रोग असुन संसर्गजन्य रोग आहे. यात सर्वात संसर्गजन्य स्ट्रेन H5NI आहे. एव्हिएन इन्फल्युएंन्झा या विषाणुचे अे, बी व सी असे तीन प्रकार असुन विषाणु अे हा कुक्कुटपक्षी, अन्य पक्षी / प्राणी तसेच मानवांमध्ये आढळत असून विषाणु बी व सी फक्त मानवांमध्ये आढळतो. या विषाणुद्वारे रोग उद्भवण्याचा कालावधी हा 24 तास ते 14 दिवसांचा आहे. सदर रोगाचा प्रसार एका कुक्कुट पक्षातुन दुसऱ्या कुक्कुट पक्षांमध्ये मुख्यत: हवेतुन व स्थलांतरीत पक्षी वन्य पक्षी इ.च्या माध्यमातुन होतो.
रोगाची लक्षणे याप्रमाणे आहेत : – 1.औदासिनता 2. खाद्य अगदी कमी खाणे 3. अंडी उत्पादन कमी होणे 4. शिंकणे व खोकणे 5. डोळ्यांमधून खुप पाणी येणे 6. डोक्यावर सुज असणे 7. डोक्यावरील तुऱ्यावर फोड येणे 8. पंख नसलेला भाग निळसर पडणे.
रोगप्रादुर्भाव टाळणेसाठी पोल्टी फार्मला इतर राज्यातुन / जिल्ह्यातुन येणारऱ्या वाहनांचे निर्जतुकीकरण व पक्षीगृहांना बाहेरुन निर्जंतुकीकरण करणेसाठी 2 टक्के सोडिअम हायड्रोक्साईड, किंवा 2 ते 4 टक्के सोडिअम हायपोक्लोराईट याचा वापर करावा.
मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 ( 1 ) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमुद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसुचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजीकच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना देणे व त्यांनी सदर माहिती ही जवळच्या पशुवैद्यकिय संस्थेला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here