
चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
मतदानाचे दिवशी सुरक्षा व शांतता अबाधीत राहावी म्हणूज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ज्या ग्रामपंचायतीचे मतदार क्षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रात दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्र व लगतच्या 100 मीटर परिसरात कलम 144 नुसार जमावबंदी आदेश पारित केले आहेत.
या आदेशानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुह यांना एकत्रित जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच मतदान केंद्र व लगतच्या परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, कार्डलेस फोन, वायरलेस सेट, दुचाकी वाहन, व्हिडीओ चित्रीकरण, फोटोग्राफी, शस्रे इत्यादीस प्रतिबंध राहील.
सदर आदेश दवाखाण्याच्या गाड्या दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, शासकीय कर्तव्यार्थ कर्मचाऱ्यांच्या गाड्या, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्या, टॅक्सी, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, दवाखाण्याकडे जाणारी वाहने, आजारी व्यक्तीकरिताचे व अपंगाचे वाहन यांना लागू राहणार नाही.
आदेशाचे पालन न केल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे.
तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीने व कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या आधी, मतमोजणीपुर्वी व मतमोजणीनंतर मतमोजणी केंद्रे निर्जंतूकीकरण करण्याचे तसेच मतमोजणी केंद्राच्या प्रवेश द्वारावर मतमोजणी प्रतिनिधी व मतदार यांचे थर्मल चेकिंग करण्यासाठी पुरेसा आरोग्य कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे.