

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,राज ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. नव्या निर्णयानुसार फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपात केलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात केली आहे. तर नक्सलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे माजी अर्थमंत्री व विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सुरक्षा पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे.
या विषयी आपली प्रतिक्रिया देतांना राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धन्यवाद देत ‘आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्ह्यात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय.आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल’ असा टोला देखील लगावला आहे.