
चंद्रपूर,६ जानेवारी: समाज प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य पत्रकारितेचे आहे. केवळ प्रबोधन करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती आणि आचरणही करून पत्रकारांनी समाजापुढे आदर्श निर्माण करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिन समारंभ या कोरोना संक्रमण काळात भव्यदिव्य स्वरूपात आयोजीत न करता अत्यंत साधेपणाने आयोजीत करून समाजापुढे कारोनाकाळात गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा आदर्श निर्माण केला आहे.अश्या शब्दात पत्रकार संघाचे कौतूक मराठी पत्रकार परिषद मुंबईचे केंद्रीय प्रतिनिधी मुरलीमनोहर व्यास यांनी पत्रकार दिन समारंभात केले. ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत पत्रकार दिन समारंभाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा परिषद प्रतिनिधी श्री बबनराव बांगडे होते. तर प्रमुख पाहणे म्हणून सहाय्यक माहिती अधिकारी श्री गजानन जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ विद्येची देवी माता सरस्वती चे पुजन, मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून करण्यांत आला. कोरोना संक्रमणामुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार सत्कार समारंभाना या वर्षी स्वगीत करण्यात आले.सर्व तालुका पत्रकार संघांनी आपआपल्या तालुक्यास्थळी कार्यक्रम आयोजीत करण्याचे निर्देश देण्यात आले.
समाज प्रबोधनासोबत व्यवसासिकता ही आवश्यक-गजानन जाधव या प्रसंगी गजानन जाधव म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारितेचे मुख्य स्वरूप समाज प्रबोधन होते, पण आजच्या काळात समाजप्रबोधनासोबत पत्रकारितेला व्यवसायिक स्वरूप आले आहे. म्हणून पत्रकारांनी वृत्तपत्रांचा दर्जा, खप आणि जाहिरात आदिकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे. जिल्हा वृत्तपत्रांच्या काही समस्या असतात त्या संदर्भात आवश्यक ती मदत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यांत येईल, असा विश्वासही त्यांनी दर्शविला. श्री बबनराव बांगडे यांनी या प्रसंगी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे सरचिटणीस सुनिल तिवारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री रवि नागापुरे यांनी केले. या प्रसंगी पत्रकार संघाचे सचीव श्री नामदेव वासेकर, सौ. शोभाताई जुनघरे, श्री ज्ञानेश्वर जुनघरे, विजय लडके, हेमंत रूद्रपवार, जयवंत पाडवार, श्री.ठाकरे आदि मान्यवरांसह शहरातील पत्रकार उपस्थित होते.