पाणी पुरवठयाबाबत दुर्लक्ष खपवून घेणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,4 जानेवारी:बल्‍लारपूर शहरातील पाणीपुरवठा कायम नियमित व्‍हावा यादृष्‍टीने आवश्‍यक संसाधने उपलब्‍ध करत सर्व अडचणी दूर कराव्‍या आणि नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करावा असे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. पाणी पुरवठयासंदर्भात नागरिकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. 9 जानेवारी पासून बल्‍लारपूर शहरातील पाणी पुरवठा नियमितरित्‍या सुरू होईल, असे आश्‍वासन मजिप्राचे कार्यकारी अभियंता श्री. झळके यांनी दिले.

बल्‍लारपूर शहरात गेल्‍या काही दिवसांपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा होत असल्‍याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्‍याच्‍या तक्रारी काही नागरिकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केल्‍या असता आ. मुनगंटीवार यांनी त्‍वरीत आज बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी श्री. सरनाईक, मजिप्राचे अधिक्षक अभियंता श्री. गव्‍हाणकर, कार्यकारी अभियंता श्री. झळके, श्री. घोडमारे यांच्‍यासमवेत बैठक घेतली. नदीवरील दोन पंप नादुरूस्‍त असल्‍यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्‍याचे मजिप्राच्‍या अधिका-यांनी सांगीतले. हे पंप दुरूस्‍त करण्‍याची कार्यवाही येत्‍या दोन दिवसात पूर्ण करून 9 जानेवारी पासून पाणीपुरवठा करण्‍यात येईल, असे श्री. झळके यांनी यावेळी सांगीतले.

उन्‍हाळयाचे दिवस नसताना अशा पध्‍दतीने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणे ही बाब गंभीर असल्‍याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी पाणी पुरवठयाच्‍या प्रक्रियेतील सर्व दोष दूर करून नियमित पाणी पुरवठा करण्‍याबाबत निर्देश संबंधितांना दिले. याबाबत नगराध्‍यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी 5 जानेवारी रोजी बैठक घेवून आढावा घ्‍यावा अशी सूचना त्‍यांनी यावेळी केली. या प्रक्रियेत संसाधन, निधी याबाबत काही अडचण असल्‍यास सविस्‍तर माहिती देण्‍याचे निर्देश त्‍यांनी अधिका-यांना दिले. त्‍याअनुषंगाने पाणी पुरवठा मंत्र्यांसह बैठक घेवून आपण योग्‍य तोडगा काढू, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here