गोविंदराव आदिक एक पित्रुछाया…!

गोर गरिब व सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून काँग्रेसची नेहमीची ओळख व परंपरा… त्याकाळात उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट वक्तृत्वशैली व उत्कृष्ट साहित्य अभ्यासाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात उत्तुंग झेप घेण्याच्या नेहमी तयारीत असणारे नेते म्हणजे गोविंदराव आदिक साहेब यांची आज ८२ वी जयंती…
मला आठवते माझे वडील श्रीनिवासजी तिवारी,गोविंदरावजी आदिक साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब हे अगदी जवळचे मित्र,मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो,आणि गोविंदराव आदिक साहेब आणि शरदराव पवार साहेब यांचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. माझे वडील श्रीनिवासजी तिवारी व गोविंदराव आदिक साहेब यांची मैत्री मी अगदी जवळून अनुभवली आहे.अनेकदा आमच्याकडे राजकीय हालचालींचा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी स्व.गोविंदराव आदिक साहेब व शरदराव पवार साहेब येत असे,दिवसभर राजकारणाची व पक्षविस्तारण्याची प्लानिंग आमच्याच घरून व्हायची,सन १५.०१.२००० रोजी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले.अन माझ्या डोक्यावरून पितृछत्रच हरविले.वडिलांच्या निधनाची बातमी आदिक साहेबांना कळताच त्यांना देखील धक्काच पोहचला.
वडिलांच्या निधनानंतर बापाच्या रूपात मला गोविंदरावजी आदिक यांनी सांभाळून घेतले,वडिलांच्या जाण्याने मला आपल्या पितृछायेत नेहमीच गोविंदराव आदिक साहेबांनी ठेवले.व व मला एक वडिलांचे प्रेम दिले.
त्यांचे अफाट प्रेम व त्यांचे राजनेतिक कौशल्य मला जवळून भावून गेले.माझे लहानपण हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात गेले, जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यक्रमात मी वडिलांच्या पाठोपाठ जात होतो. अश्यातच माझी ओळख गोविंदराव आदिक साहेबांसोबत झाली.साहेबांचे कार्यक्रम विदर्भातल्या कोणत्याची जिल्ह्यात असो मी त्या तारखेला त्या ठिकाणी पोहचून जात असे.संपूर्ण कार्यक्रम आटोपला कि हळूच मी साहेबांच्या आजूबाजूने कुठेतरी जागा बनवून चुपचाप उभा राहत होतो.व तितक्यात मी त्यांना दिसलो कि साहेब जवळ घेऊन खांद्यावर हात ठेऊन आपुलकी व प्रेमाने विचारपूस करत होते.हा जो विचारपूस करण्याचा त्यांचा अंदाज वारंवार मनाला वेग वेगळे प्रश्न करत होता.
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ वर्षाहून अधिक वेळ मी त्यांच्या संपर्क व सानिध्यात होतो.या १५ वर्षात मला शेकडो अनुभव व राजकारणाची दिशा व जनतेला जवळून अभ्यासण्याचा योग आला.
कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर याच काळात साहेब पत्रकारितेतही काहीकाळ रमले होते.साहेबांनी ‘विशाल सह्याद्री’ वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून काम करता करता त्यांनी ‘श्रीरामपूर टाइम्स’ हे साप्ताहिकही चालविले.त्यांना पत्रकारितेची जान व या क्षेत्रातला दांडगा अनुभव होता. मला देखील लहानपणा पासून पत्रकारितेची आवड असल्याने साहेबांपासूनच प्रेरणा मिळाली. आज माझ्या “चंद्रपूर एक्सप्रेस” नावाच्या साप्ताहिकाचे प्रेरणास्थान देखील गोविंदराव आदिक साहेबच आहेत,माझ्या आजची वृत्तपत्राच्या डाव्या बाजूला प्रेरणास्थान:स्व.गोविंदराव आदिक व वृत्तपत्राच्या उजव्या बाजूला माझे वडील स्व.श्रीनिवासजी तिवारी यांचा उल्लेख होतो.

साहेबांचे भाषण ऐकणे म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एकप्रकारची वैचारिक मेजवानीच असायची. मराठी कविता, उर्दू शेरोशायरी व हिंदी काव्यपंक्तींची पखरण करीत फुलविलेले भाषण श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत असे. अनेक अवघड विषय सोपे करून समजून सांगण्यात साहेबांचा हातखंडा होता. कर्तबगार पण दुर्लक्षित कार्यकर्त्यांना पारखून त्यांना ताकद देण्यात साहेब नेहमी पुढेच असायचे.

आदर्शवत संघटन शैलीचे कसब अंगी बाणवलेले गोविंदराव आदिक साहेब नेहमी बेरजेचे राजकारण करणारे व सर्वांना समवेत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणूनच असा सर्वप्रिय नेता नेहमी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कायम राहिला. दुर्दैवाने ते पद त्यांना कधी मिळाले नाही. पण राज्याच्या राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने श्रीरामपूरचाही लौकिक राज्यात वाढविला.
शरद पवार साहेब व आदिक साहेब यांची राजकीय कारकीर्द जवळपास एकाचवेळी सुरू झाली. पवार साहेबांचे राज्यातील खंदे समर्थक अशीच गोविंदराव आदिक साहेबांची नेहमी ओळख राहिली आहे.अश्या या अनुभवी “गोविंदाने” दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार, दोनदा मंत्रिपदे, एसटी महामंडळाचे अध्यक्षपद अशी राजकीय मजल त्यांनी मारली.
साहेब उच्च शिक्षित असल्याने अभ्यासूपणाच्या जोरावर तसेच, सहा फुट सात इंचीच्या लोभस व्यक्तिमत्त्व व उत्कृष्ट वक्तृत्व शैली यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला यश लाभत गेले. हाताशी सहकारी संस्था वा सहकारी साखर कारखाने नसतानाही केवळ संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची छाप निर्माण केली.ऊस तोडणी कामगारांपर्यंत विविध कामगार संघटनांचे नेतृत्वही त्यांनी केले.
साहेबांनी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर काँग्रेस संघटन मजबूत केले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात साहेबांना मानणारे कार्यकर्ते तयार झाले.साहेबांनी आयुष्यभर पक्षसंघटनेत विविध पदे भूषविली.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याआधी सरचिटणीस म्हणूनही काम करताना काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे, तसेच काँग्रेस सत्तेच्या योजना कार्यकर्त्यांमार्फत तळागाळापर्यंत पोचविण्याचे त्यांचे नियोजन वाखाणण्यासारखे ठरले. काँग्रेसअंतर्गत गटबाजीच्या राजकारणातही स्वकर्तृत्वावर वेगळेपणाचा ठसा उमटवताना उत्तुंग राजकीय कारकीर्द घडविणारे गोविंदरावजी आदिक यांचे विचार नेहमीच काळाच्या पुढचे राहिले आहेत. त्यांचे संघर्षमय राजकीय व सामाजिक कामच त्यांचे वेगळेपण जपणारे व नव्या पिढीला दिशादर्शकही ठरणार आहे.

आज साहेबांचा राजकीय वारसा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव अविनाश गोविंदरावजी आदिक व मुलगी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा अनुराधाताई गोविंदरावजी आदिक चालवीत आहेत.मला आनंद आहे कि साहेब जरी आमच्यात नसले तरी त्यांचे वंशज आज परत साहेबांच्या रुपात अहमदनगर वासियांना व कामगारांना मिळाले.
अविनाश भाऊ आज मला मोठ्या भावाच्या रुपात मिळाले आहे.आदिक परिवार व तिवारी परिवाराचे पारिवारिक तसेच मैत्री पूर्वक संबंध परंपरागत चालत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
अश्या कित्तेक आठवणी आहेत ज्या लिहून संपू शकत नाही. माझे वडील गेल्यानंतर मला जे साहेबांकडून मिळाले ते एका वडिलाच्या प्रेमापेक्षा काही कमी नव्हते….

सुनील श्रीनिवासजी तिवारी
संपादक
“चंद्रपूर एक्सप्रेस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here