
चंद्रपूर ३० डिसेंबर – नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास आता चंद्रपूरमध्ये कारवाई करण्यात येणार आहे. पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे.
मकरसंक्रांतीच्या आधीच काही दिवस पतंगबाजी सुरू होते. ही पतंगबाजी महिनाभर सुरू असते. पतंगबाजी करताना काटाकाटीच्या स्पर्धेत चिनी आणि नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पतंगप्रेमींबरोबरच रस्त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायालयाने सरकारला केली.
त्यानुसार राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने पथके गठीत केली आहेत. मनपा हद्दीतील दुकानांना याबाबत सूचना देण्यात येत आहेत; तसेच आपल्या आजूबाजूला नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करताना कुणी आढळल्यास कळवण्याचे आवाहनही चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे .