चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 16 हजारावर आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार कोरोना लस

चंद्रपूर, दि. 19 डिसेंबर : कोरोना विरुध्दच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील 16 हजार 69 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. यात शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिस सुरक्षा दल, नगरपालिका व महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. तर तिसऱ्या टप्यात 50 वर्षांवरील नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. लसीकरणाची पुर्वतयारी करण्यात आलेली असून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात लस साठवण्याची क्षमता पुरेशा प्रमाणात असून एकूण ८० शितसाखळी केंद्रे आहे.
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने मायक्रोप्लान तयार केला असून सदर तयारीचाच भाग म्हणून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश असलेल्या 637 जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण दि. 18 डिसेंबर 2020 रोजी पुर्ण करण्यात आले.
कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रतिक बोरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. हेमचंद किन्नाके, वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण पथक डॉ. प्रिती राजगोपाल, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.मोहम्मद साजिद, यु.एन.डी.पी. चे विभागीय अधिकारी अश्विनी नागर, यु.एन.डी.पी.चे जिल्हा प्रतिनिधी गणेश धोटे यांचेकडून प्रशिक्षण देण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here