

चंद्रपूर १२ डिसेंबर – चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सायकलवरून कार्यालयात येणार आहेत. या नवीन उपक्रमाला पुढील शुक्रवारपासुन सुरुवात होणार असून ११ डिसेंबर रोजी मनपा कार्यालयात झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियान दि २ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातुन लागु केले असुन प्रत्येकाच्या जिवनाशी निगमित, निर्सगाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारीत शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरीता हे अभियान सुरु केले असुन या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी घेतला आहे.
प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी/कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणु नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नाहीये. सदर बाब वैयक्तीक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असुन प्रत्येकाने या अभियान सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी/ कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधीत किमान ०५ लोकांना महत्व पटवुन या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.