पक्ष्यांसाठी अग्निशमन कर्मचारी बनले देवदूत !

.  चंद्रपूर,25 नोव्हेंबर:निष्पाप पक्षी बऱ्याचदा मानवी चुकांचा बळी जाताना आपण पाहिले आहे. बऱ्याचदा पर्यावरण कार्यकर्ते पशू- पक्ष्यांना वाचविताना सुद्धा आपण बघितले आहे. परंतु मंगळवारी चंद्रपूर शहरात मनपाच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी जे केले ते नक्कीच हृदयस्पर्शी होते. पाईपात फसून मरणाच्या दारात तळमळत असलेल्या दोन कबुतरांना स्वतः जखमी होऊन जीवनदान देणाऱ्या या मनपा अग्निशमन कर्मचाऱ्यांची मानवीय संवेदना खुद्द मनपा चे माजी सभापती आणि चंद्रपूर शहर काँग्रेस चे अध्यक्ष रामू तिवारी यांनीच बुधवारी सकाळी सांगितली आणि ऐकणाऱ्या सर्वांनी हळव्या मनाने कौतुक केले.
24 नोव्हेंबर ची दुपार, ऊन थोडे जास्तच. अश्यात भानापेठ परिसरातल्या मथुरा पॅलेस बिल्डिंग मध्ये 2 कबुतर उडत आले आणि अचानक फिरता-फिरता एका पाईप मध्ये फसले. ही जागा इतकी अरुंद आणि अडचणीची होती की, जर काही वेळात त्यांना तिथून बाहेर काढले नसते तर त्यांचे मरण अटळ होते. दोन्ही कबुतर केविलवाणी धडपड करत होते. हे मन हेलावणारे दृश्य रामू तिवारी यांनी पाहिले. त्यांनी लगेच मनपा चे अभियंते अनिल घुमडे आणि अग्निशमन विभागाचे राजू उसरे यांना फोन केला.माहिती मिळताच राजू उसरे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. खिडकी चा काच फोडून कर्मचाऱ्यांनी पाईप असलेल्या जागी प्रवेश केला. हे करत असताना एका कर्मचाऱ्याचा हाताला दुखापात सुद्धा झाला.रक्तबंबाळ होऊनही त्यांनी शेवटी त्या दोन्ही कबुतरांची सुटका केली.
मनपा च्या कर्मचाऱ्यां वर बरेचदा आपण अकारण रोष व्यक्त करत असतो. परंतु काल याच कर्मचाऱ्यांनी जे कार्य केले ते खऱ्या अर्थाने ते कर्मचारी आणि शहराचे जबाबदार नागरिक असल्याचे गौरवपूर्ण प्रतीक असल्याची भावना रामू तिवारी सह प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here