ऊर्जावान विधानपरिषद सदस्‍य म्‍हणून संदीप जोशी आपली ओळख निर्माण करतील – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्‍हा हा वाघांचा जिल्‍हा आहे. वाघ हा शक्‍तीशाली प्राणी आहे. पदवीधर, बेरोजगार तसेच समाजातील अन्‍य समुहांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी संदीप जोशी यांना या जिल्‍हयातून शक्‍ती मिळणार आहे. या जिल्‍हयात सेवेचा मंत्र देणारे आनंदवन आहे. त्‍या माध्‍यमातुन सेवेची शक्‍ती त्‍यांना प्राप्‍त होणार आहे. संवाद, संघर्ष आणि सेवा त्रिसुत्री च्‍या माध्‍यमातुन संदीप जोशी मतदारांची सेवा करणारे ऊर्जावान विधान परिषद सदस्‍य म्‍हणून त्‍यांची ओळख निर्माण करतील असा विश्‍वास माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला. संदीप जोशी यांना प्रचंड बहुमताने विजयी करत विधान परिषदेवर निवडून पाठविण्‍याचे आवाहन यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 18 ऑगस्‍ट रोजी चंद्रपूर येथील लोकमान्‍य टिळक शाळेच्‍या प्रांगणात आयोजित विधान परिषदेच्‍या पदवीधर मतदार संघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार संदीप जोशी यांच्‍या प्रचारासाठी भाजपा महानगर शाखेतर्फे आयोजित प्रचार बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, उमेदवार संदीप जोशी, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, राजेंद्र गांधी, संजय गजपूरे, सुभाष कासनगोट्टूवार, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, ही प्रचार बैठक ज्‍या लोकमान्‍य टिळक विद्यालयाच्‍या प्रांगणात आयोजित करण्‍यात आली आहे. त्‍या लोकमान्‍यांनी स्‍वराज्‍य हा माझा जन्‍मसिध्‍द अधिकार आहे असे ठणकावून सांगीतले. आम्‍हाला स्‍वराज्‍य मिळाले व सुराज्‍य स्‍थापित होण्‍यासाठी उत्‍तम, जाणकार लोकप्रतिनिधी निवडून जाणे अत्‍यंत गरजेचे आहे. विधान परिषद हे वरिष्‍ठ सभागृह आहे. या सभागृहाच्‍या माध्‍यमातुन संदीप जोशी पदवीधर, बेरोजगार तसेच समाजातील सर्व समुहांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करतील असा मला विश्‍वास आहे. राज्‍यातल्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात जनतेच्‍या मनात असंतोष आहे. अंधेर नगरी चौपट राजा अशी आज राज्‍य सरकारची अवस्‍था आहे. विज बिल कमी करण्‍याची घोषणा सरकारने केली होती, मात्र विज बिल कमी तर केले नाही मात्र 1 एप्रिलला विज दरवाढ या सरकारने केली. पुरग्रस्‍तांमध्‍ये भेदभाव करत त्‍यांच्‍या तोंडाला पाने पुसण्‍याचे काम या सरकारने केले आहे. कंत्राटदारांचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे आहे, मंत्र्यांसाठी नव्‍या गाडया घेण्‍यासाठी पैसे आहे मात्र सर्वसामान्‍य जनतेसाठी या सरकारकडे पैसे नाही. वैधानिक विकास मंडळे हे तुमच्‍या माझ्या विकासाचे कवच आहे. या मंडळाची मुदत संपल्‍या नंतरही त्‍यास मुदतवाढ न देणा-या या सरकारला विदर्भाविषयी तसूभरही प्रेम नाही हे महाविकास आघाडी सरकारने सिध्‍द केले आहे. उषःकाल होता होता काळरात्र झाली अशी या सरकारने महाराष्‍ट्राची अवस्‍था केली आहे. अशा वातावरणात संदीप जोशी यांच्‍या विजयाच्‍या माध्‍यमातुन विकास व प्रगतीच्‍या मशाली पेटविण्‍याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले.

महापौर म्‍हणून नागपूर महानगराच्‍या विकासात मोलाचे योगदान देणारे संदीप जोशी हे उत्‍तम लोकप्रतिनिधी आहे. त्‍यांच्‍यातील सुजाण लोकप्रतिनिधी महाराष्‍ट्र विधान परिषदेत जाणे व त्‍या माध्‍यमातुन युवकांच्‍या प्रश्‍नांच्‍या सोडवणूकीचा मार्ग मोकळा होणे आवश्‍यक आहे. यादृष्‍टीने संदीप जोशी यांना मोठया बहुमतासह विजयी करण्‍याचे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. विधान परिषदेचा नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्‍ला आहे. या मतदार संघातील भाजपाची विजयी परंपरा आपण कायम राखणार असून पदवीधर, बेरोजगारांच्‍या प्रश्‍नांच्‍या सोडवणूकीला आपण प्राधान्‍य देणार असल्‍याचे उमेदवार संदीप जोशी यावेळी बोलताना म्‍हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. प्रचार बैठकीला पदवीधर मतदारांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here