जिल्ह्यातील पदवीधर आणि बेरोजगारीच्या समस्या गांभीर्याने सोडविणार : संदीप जोशी

गडचिरोली, अहेरी भागात कार्यकर्त्यांची बैठक

गडचिरोली : गडचिरोली, अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. येथे अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही. या सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी दिले. मंगळवारी (ता.१७) त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
यावेळी त्यांच्या समवेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश सचिव राजेश बकाने, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री रवीभाऊ ओल्लालवार प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. याव्यतिरिक्त रोजगाराचीही मुख्य समस्या आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यातील अनेक विकास कामे रखडली आहेत. या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. अनुदानित असो वा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या समस्या, सेवानिवृत्त शिक्षकांच्या २००५ नंतरच्या पेन्शनचा विषय, अशा सर्व प्रश्नांवर काम करणे सुरू झाले असून येत्या काही दिवसात समस्या सोडवू, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
माझी बरीच मोठी राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी आहे. मी एका सामान्य कार्यकर्त्यापासून काम करणे सुरू केले. दीनदयाल थाळी च्या मध्यमातून मेडिकल मधील रुग्णांच्या नातेवाईकांना १० रुपयात जेवण देण्याचे काम माझी संस्था करते. मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना झोपण्याची व्यवस्था नसल्याने ते कुठेही, अशा नातेवाईकांसाठी आता १० रुपयात राहण्याची व्यवस्था दीनदयाल निवारा च्या माध्यमातून करणार असल्याचेही संदीप जोशी म्हणाले.
पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले तर विजय आपलाच आहे, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
संदीप जोशी यांनी अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, वडसा या भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. अहेरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, भामरागडचे सुनील बिश्वास, भाजपा आदिवासी आघाडी मोर्चाचे प्रकाश गेडाम उपस्थित होते.
चामोर्शी येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना संदीप जोशी यांनी पदवीधर मतदार संघाचा इतिहास सांगितला. पदवीधर निवडणूक ही संघटन कार्याची परीक्षा असते. संघटनेने काम केले तर निवडणूक पक्ष जिंकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपणच जबाबदारीने काम करा, असे सांगितले. यावेळी बंगाली आघाडीचे सुरेश शाह, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजपा व्यापारी आघाडीचे जगदीश टावरी, राहुल चोपरा उपस्थित होते.
गडचिरोली येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष योगिता तितरे, संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे उपस्थित होते. येथील आयोजित मेळाव्याला संदीप जोशी यांनी संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here