धार्मिक स्‍थळे उघडणे हा भारतीय जनता पक्षाचा विजय – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून कोरोनाचा प्रकोप संपूर्ण महाराष्‍ट्रातच नव्‍हे तर देशात थैमान घालत होता. त्‍यानंतर टप्‍प्‍याटपप्‍याने प्रतिष्‍ठाने, सरकारी कार्यालये, सिनेमागृहे, माल्‍स, जीम व अन्‍य अनेक गोष्‍टी महाराष्‍ट्रात सुरू झाल्‍या. या पार्श्‍वभूमीवर गेल्‍या काही महिन्‍यांपूर्वी संपूर्ण महाराष्‍ट्रातील धार्मिक स्‍थळे उघडण्‍यासाठी भारतीय जनता पक्षाने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात  सरकारला विनंती व आग्रह केला. यासंदर्भात शासनाला आ. मुनगंटीवार यांनी वारंवार पत्रव्‍यवहारही केला. त्‍यानंतर घंटानाद आंदोलन ही केले. चंद्रपूरातही मोठया प्रमाणात घंटानाद आंदोलन झाले. यात सर्वधर्मीय धर्मगुरू व समाजबांधव आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात उपस्थित होते, परंतु एवढे सर्व होवूनही महाराष्‍ट्र शासन दारूचे दुकान उघडण्‍यास तसेच बार व रेस्‍टारंट उघडण्‍यास परवानगी देत होते, परंतु धार्मिक स्‍थळे उघडण्‍यास शासन तयार नव्‍हते.

अखेर महाराष्‍ट्र शासनाला सुबुध्‍दी सुचून आजपासून सर्व प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यास शासनाने परवानगी दिली. या पार्श्‍वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूरातील श्री माता महाकाली मंदिरात आज आरती करण्‍यात आली. आ. मुनगंटीवार यांनी माता महाकालीचे दर्शन घेवून सर्वांना करोनामुक्‍त करण्‍याचा आशिर्वाद मागीतला. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, हा भारतीय जनता पक्षाच्‍या आंदोलनाचा विजय आहे, परंतु भाविकांनी मंदीरात दर्शन घेताना शासनाने सांगीतलेल्‍या सर्व अटी व शर्तींचे पालन करावे, जेणेकरून आपण सर्वजण कोरोना या आजारापासून दूर राहू. सर्वांनी मंदीर परिसरात पूर्णवेळ मास्‍क घालावा व सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा. मंदीर प्रशासनाला रोज संपूर्ण मंदीर सॅनिटाईज करण्‍याचा सूचना सुध्‍दा आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

या कार्यक्रमाला महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, महानगर महिला अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, महानगर भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, विदर्भ अध्‍यात्‍मीक आघाडीच्‍या सहसंयोजिका शिल्‍पा देशकर, रविंद्र गुरनुले, शिलाताई चव्‍हाण, कल्‍पना बगुलकर, संजय कंचर्लावार, प्रदिप किरमे, प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, निखील तांबेकर, धनराज कोवे, नितीन गुप्‍ता, महेश कोलावार, अमोल नगराळे, मंदीराचे विश्‍वस्‍त श्री. महाकाले, दशरथ सोनकुसरे, राकेश बोमनवार, रामकुमार, धम्‍मप्रकाश भस्‍मे, ज्‍योती गेडाम, संदीप आगलावे, राजेश यादव, शुभम गेडाम  यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here