
चंद्रपूर, दि. 5 नोव्हेंबर: सर्व शासकीय कार्यालयात नियमित कामकाजासोबतच निवडणूक व इतर विषयाचे कामेदेखील पुर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कोविडचा विषय कोणत्याही परीस्थितीत मागे पडू देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी ऑक्सीजन टँक पुर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता किती व त्याप्रमाणात उपलब्धता किती तसेच अॅंटीजेन किटची उपलब्धता, फिरते कोविड तपासणी पथकाचे (मोबाईल युनिट) कामकाज, कोरोना केअर सेंटर, उपलब्ध मनुष्यबळ याबाबतची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेकडून जाणून घेत आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णालयासाठी लागणारी आवश्यक साधन सामुग्री, यंत्र सामुग्री व औषध पुरवठा, आयसीएमआर ने दिलेल्या निर्देशाप्रमाणे खरेदी करावी तसेच ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयएलआय व सारी रुग्णांच्या तपासणीवर भर देण्याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी संबंधितांना निर्देश दिलेत. बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.