
चंद्रपूर:राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात मंजूर पत्रकार भवन तसेच मुख्याधिकारी निवासस्थान या विकासकामांचे बांधकाम पूर्ण झाले असून या बांधकामाचे लोकार्पण तसेच खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर महात्मा ज्योतीराव फुले सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायं. 4.00 वा. पोंभुर्णा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निवासस्थानाचे लोकार्पण तर सायं. 4.30 वा. पत्रकार भवनाचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सायं. 5.00 वा. महात्मा ज्योतीराव फुले सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. गेल्या वर्षी पोंभुर्णा येथे माळी समाज बांधवांच्या मेळाव्यात आ. मुनगंटीवार यांनी समाजबांधवांच्या मागणीनुसार पोंभुर्णा शहरात सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. सदर सभागृहाच्या बांधकामासाठी खनिज विकास निधी अंतर्गत 80 लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला असून या सभागृहाचे भूमीपूजन 31 ऑक्टोबरला संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पोंभुर्णा नगर पंचायतीच्या अध्यक्षा सौ. श्वेता वनकर, उपाध्यक्षा सौ. रजिया कुरैशी, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, पोंभुर्णा नगर पंचायतीचे सदस्य, ईश्वर नैताम, विजय कस्तुरे, मोहन चलाख, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. पुष्पा बुरांडे, सौ. नेहा बघेल, किशोर कावळे, अजित मंगळगिरीवार, पंचायत समितीचे उपसभापती सौ. ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदसय विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील जनतेला, पत्रकार बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करून होत असलेल्या वचनपुर्तीच्या या सोहळयाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.