स्थायी समिती सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्तीला ‘आर्थिक व्यवहाराची’ किनार !

‘भाऊंचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे वरील ‘अवास्तव लाड’ !
चंद्रपूर शहर मनपात सहा महिन्यांपासून स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्याचं नाही !
शासनाच्या आदेशाला मनपा आयुक्त व स्थायी समिती सभापतीकडून ‘केराची टोपली !’

चंद्रपूर (वि.प्र.) चंद्रपूर शहर मनपाच्या १६ स्थायी समिती सदस्यांपैकी ८ सदस्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपला. कोरोना परिस्थितीमुळे नविन स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती रखडली, ९ सप्टेंबर २०२० रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या रिक्त पदासाठी निवडणुकासंदर्भात आदेश काढले, परंतु चंद्रपूर शहर मनपा चे आयुक्त व स्थायी समिती सभापती हे जाणिवपूर्वक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असुन या रखडलेल्या निवडणुका घेण्यास स्थायी समिती सभापती इच्छुक नसून याला ‘आर्थिक व्यवहाराची’ किनार असल्याच्या चर्चाना मनपा सदस्यांमध्ये पेव फुटले आहे. नगर विकास अधिनियमाच्या कलम २०(५) नुसार आठ महिन्यांपासून रखडलेल्या स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्या होणे गरजेचे असतांना ही तसे न करता मनपा प्रशासन स्थायी समिती सभापतीपुढे ‘नतमस्तक’ होत असल्याचे बोलल्या जाते. हाती आलेल्या वृत्तानुसार स्थायी समिती सभापती मनपामधील काही कंत्राटाला मुदतवाढ देण्याच्या व काही नव्या कंत्राटाला(विशेषताः कचरा संकलन) मंजूरी देण्याच्या मनःस्थितीत असल्यामुळे ह्या स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ पुर्ण होऊन ही नविन सदस्यांच्या निवडणुका घेत जात नसल्याचे सांगीतल्या जात आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी मनपा ची स्थायी समिती ची सभा पार पडली, परंतु त्यात स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे सत्ताधारी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तीनही झोन मधील सभापती व महिला व बालकल्याण सभापती ची निवडणूक देखील या अडेलतट्टू धोरणामुळे रखडले आहे, पण त्याची चिंता कुणालाही नाही असे यातून स्पष्ट होते.

भाऊंचे’ स्थायी समिती सभापती राहुल पावडे वरील ‘अवास्तव लाड’ !

चंद्रपूर शहर महानगर पालिका ही भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे राहुल पावडे यांना मनपाच्या स्थापनेपासूनचं स्थायी समिती सभापती पदी आम. मुनगंटीवार यांनी चिकटविले आहे. खुर्ची च्या मोहात अडकलेले राहुल पावडे आता खुर्चीसाठी लोटांगण घालत असुन सर्वच नियम त्यांनी धाब्यावर बसविल्यामुळे मनपा सत्ताधाऱ्यांच्या गोटात असंतोष पसरला आहे. ही बाब भाजपसाठी येणाऱ्या काळात नक्कीच धोकादायक राहील, यात संशय नाही.

मागील अकरा महिनेपासून स्थायी समिती सभापती सोबतच चंद्रपूर मनपाचे उप-महापौर पद ही राहुल पावडे यांना देण्यात आले. मनपाच्या एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदारीचे पद असल्यामुळे मनपात भाजपजवळ दुसरा कोणी “लायकी”चा नगरसेवक नाही का असाही प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. उपमहापौराचे केबिन चे द्वार जनसामान्यांसाठी बंद आहे. हे चंद्रपूर शहरातील जनतेवर अन्याय नाही कां? याचाही विचार भाजपच्या वरिष्ठांनी केला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात चंद्रपूर चे नांव मोठे करणारे राज्याचे माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांनी या बाबीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शहर मनपा ही भाजपच्या ताब्यात असून अभ्यासू असलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राहुल पावडे यांचे ‘अवास्तव लाड’ कां बरे पुरवित आहेत, याबाबत आता उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाऊंच्या अशाच ‘अवास्तव लाडा’चे दुष्पपरिणाम विधानसभा निवडणुकीत शहर भाजपला भरावे लागले होते, याचे विस्मरण तर भाऊंना झाले नाही नां! ही चर्चा आता भाजपच्या गोटात होऊ लागली आहे. नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणात “नाथा”भाऊ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे निष्ठावान एकनाथ खडसे यांनी भाजपला शेवटचा राम-राम केला. असेच अडेलतट्टू धोरण राहिले तर चंद्रपुरात ही “नाथा”भाऊंची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. चंद्रपूर शहराच्या विकासाकडे “भाऊ” जाणिवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही नां! असा प्रश्न चंद्रपूरकरांना आता पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here