गृह विलगीकरण : एक उत्तम पर्याय  

मागील नऊ-दहा महिन्यांपासून सर्वत्र कोविड -19 या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनामार्फत देखील त्यादृष्टीने नियोजन करून ऑक्सीजन बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. रुग्णांना पूर्ण उपचार मिळेल यावर प्रशासनाची देखरेख आहे. तथापि एकंदर आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गरजू रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.

गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावे व त्यासोबतच योग्य व्यवस्थापनाद्वारे आजाराचे संक्रमण खंडीत व्हावे यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासनाने गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) हा सक्षम पर्याय उपलब्ध करुन दिला असून त्यासाठी रुग्णांनी व त्याच्या नातेवाईकांनी पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे.

वास्तविक पाहता कोविड-19 ची लागण झालेल्या साधारण 60 ते 70 टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे दिसून येत नाही किंवा अतिशय सौम्य लक्षणे आढळतात. अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात तातडीने भरती होण्याची गरज भासत नाही. असे रुग्ण डॉक्टरांनी परवानगी दिली तर घरीच विलगीकरणात राहून स्वयंम देखरेख व योग्य औषध उपचाराने बरे होऊ शकतात. यालाच गृह विलगीकरण किंवा होम आयसोलेशन असे म्हणतात. ज्या रुग्णामध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे असतात अशा रुग्णांना मात्र कोविड रुग्णालयामध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावे म्हणून लक्षणे नसणाऱ्या व अति सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्विकारल्यास  गंभीर आजारी रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड सुद्धा उपलब्ध होईल.

गृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणीत करणे आवश्यक आहे.संबंधीत रुग्णाच्या घरी त्याच्या विलगिकरणासाठी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींकरीता अलगीकरणासाठी (होम कॉरंटाईन) योग्य सोई सुविधा व घरी दिवस रात्र 24×7 काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधीत काळजी वाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे व ते सतत अॅक्टिव्ह असेल याविषयी दक्ष राहावे. रुग्णांने स्वत:चे गृह विलगिकरण करण्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र नमुद केलेल्या अटी व शर्तीसह सादर करावे व सर्व मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे.

प्रतिज्ञा पत्र व सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे संमती पत्र सादर केल्यानंतरच सदर रुग्णास गृह विलगीकरण्यासाठी पात्र ठरविण्यात येईल. प्रत्येक रुग्णांस होम आयसोलेशन किट बाळगणे अनिवार्य आहे तसेच घरी कोणीही व्यक्ती 55 वर्षापेक्षा जास्त वयाची असल्यास किंवा कर्करोग, तीव्र दमा, श्वसन विकार, मधूमेह, उच्च रक्तदाब, मुत्रपिंड विकार इत्यादि सारख्या गंभीर वैद्यकिय आजार असल्यास व घरी गर्भवती माता असल्यास रुग्ण बरा होईपर्यंत त्यांची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी. यानंतर एमबीबीएस, पदवीधारक व एमबीबीएस नंतरची कोणत्याही तज्ञ पदवीधारक डॉक्टरांना रुग्णास प्रमाणित करुन, त्यांना प्रमाणपत्र देणे व शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे फी आकारुन देण्याची मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक रुग्णाने होम आयसोलेशन किट ज्यामध्ये पल्स ऑक्सीमिटर, थर्मा मिटर व इतर बाबी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

टेस्ट करिता नमुना घेतल्यापासुन रुग्णाने 17 दिवस घरीच रहावयाचे आहे. याकाळात रुग्णाने स्वतः व काळजीवाहू व्यक्तीने सातात्याने प्रकृतीकडे लक्ष ठेवावे व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. दररोज सकाळ सध्याकाळ डॉक्टरांशी संपर्क साधुन आपल्या प्रकृतीबद्दल माहिती द्यावी व त्याचवेळी डॉक्टरांनी सुध्दा आवश्यक त्या सुचना देऊन योग्य औषधोपचार करावा व गरज भासल्यास रुग्णालयामध्ये दाखल होण्यास संदर्भ सेवा सुध्दा द्यावी. रुग्णाला विहित कालावधी नंतर  कोणतेही लक्षण न आढळल्यास रोगमुक्त ठरविण्यात येईल. त्यांनी पुढे देखील काही दिवस घरीच राहुन प्रकृतीवर लक्ष ठेऊन स्वत:ची काळजी घ्यायची आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 3 हजार 511 नागरिकांनी गृह विलगीकरणाचा लाभ घेतला आहे. यात चंद्रपूर शहर-1724, बल्लारपूर-326, राजुरा-88, गडचांदूर 76, कोरपना-4, जिवती-1, गोंडपिंपरी-27, मुल-325, सावली-22, नागभीड-171, सिंदेवाही-2, ब्रह्मपुरी-231, चिमूर-118, वरोरा-156 आणि भद्रावती-250 नागरिकांचा समावेश आहे.

संबधीत व्यक्तींना गृह विलगीकरण संदर्भात हवी असलेली माहिती किंवा  तात्काळ सेवेसाठी 07172-274161, तक्रार 274162, 274163 या प्रशासनाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे. अशी माहिती गृह विलगीकरण कक्षाचे नोडल अधिकारी डॉक्टर डॉ.राहुल भोंगळे (9823448896) यांनी दिली आहे.

तरी गृह विलगीकरणाचा पर्याय स्विकारणाऱ्या रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) ही एक वैयक्तीक तसेच सामाजिक जाबाबदारी व कर्तव्य समजुन प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे. तसेच पात्र रुग्णांनी गृह विलगिकरणात असतांना आपल्या कुटुंबीयांना संसर्ग होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here