रस्त्यावर खड्डे, अमृत योजनेच्या कामात सावळा-गोंधळ !

संथगतीने सुरू असलेल्या कामाला खड्यांचे ग्रहण !

चंद्रपूर (प्रति.) मागील काही महिन्यांपासून शहरामध्ये अमृत योजनेच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. संथगतीने सुरू असलेल्या या कामाला खड्यांचे ग्रहण लागले आहे. पाण्याच्या टाकीपासून प्रत्येक वार्डा-वार्डामध्ये पाईप लाईन टाकण्याच्या या कामात कंत्राटदारांकडून चांगल्या रस्त्याला खोदून त्याठिकाणी पाईप लाईन टाकण्याचे काम केल्या जाते, परंतु नंतर हे खड्डे बुजविण्याची सोपस्कार मात्र कंत्राटदारांकडून पार पाडल्या जात नाही. यासंबंधात संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली असता कंत्राटदारांकडे काम पुष्पळ असल्यामुळे विलंब होत आहे, असे बेशरमपणाचे उत्तर नागरिकांना ऐकावे लागते. नुकतेच रामनगर परिसरातील विदर्भ हाऊसिंग कॉलनीतील रेव्हेन्यु कॉलनी व जिल्हा स्टेडियम ला जोडणाऱ्या रस्त्यावर अमृत योजनेचे कामासाठी रस्त्याच्या कडेला नाली खोदण्यात आली, परंतु नाली बुजविण्याचा कंत्राटदाराला विसर पडला. मनपाच्या झोन क्र. १ मध्ये येणारा या भागाचे नगरसेवक मनपा चे स्थायी समिती सभापती राहुल पावडे हे आहेत, त्यांचे ही याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. यासंबंधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कंत्राटदारांकडे भरपूर कामे असल्यामुळे उशिर होत असल्याचे चौकटीतील उत्तरे ऐकायला मिळतात. विशेष बाब म्हणजे सद्यपरिस्थितीत सामान्य नागरिक कोरोना आजारामुळे तणावात आहेत. रस्त्यावर पडलेले हे खड्डे ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक सिद्ध होत आहेत. परंतु याकडे जाणिवपुर्वक नगरसेवक व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमृत योजनेच्या कंत्राटदाराने रस्त्यावरील ही कामे त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना पेटी कॉन्ट्रक्टवर दिली असल्यामुळे व त्या-त्या भागातील नगरसेवकांचे त्यांच्यासोबतच्या हितसंबंधामुळे प्राणघातक असलेल्या या खड्यांकडे कंत्राटदार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहे. सद्यस्थितीत विदर्भ हाउसिंग सोसायटी येथील अमृत योजनेचा कंत्राटदार खड्डे खोदून नागरिकांची कंबरडे मोडण्यासाठी मागील २५ दिवसांपासून गायब झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here