
चंद्रपूर : देशात, महाराष्ट्र राज्य तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या साथीचा फैलाव स्थिरावला असून गत दोन ते तीन आठवड्यापासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या व कोरोना मुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या घटली आहे. मात्र डिसेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी लक्षात घेता कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नसल्याचे मत तज्ञ् मंडळीनी मांडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशाऱ्याला गंभीरतेने घेऊन सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमाचे पालन केले गेले तरच कोरोनाचा समूह संसर्ग व साथ नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा प्रकोप टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची उपस्थिती होती.
कोरोनावर लस उपलब्ध होइस्तोवर मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता हे उपायच लसीचे काम करणार आहेत. आगामी काही महिने सर्व देशवासीयांसाठी आवाहनात्मक असून प्रत्येकाने सावधगिरी व खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट न येऊ देणे आपल्याच प्रत्येकाच्या हाती आहे.
कोविड १९ लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोना नियंत्रणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल. पण तोपर्यंत संपूर्ण काळजी न घेतल्या गेल्यास ९० टक्के लोकांना कोरोनाचा धोका होऊ शकतो. देशभरात ७४,९४,५५१ कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५,९७,२०९ रुग्ण बरे झाले असून मृत्यसंख्या १,१४,०३१ झालेली आहे. यावर प्रभावी उपाययोजना व जनजागरण करून नियंत्रण मिळविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.