होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

चंद्रपूर २९ सप्टेंबर  – कोव्हीड १९ अंतर्गत होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, २७१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     इंडस्ट्रीयल प्रभागात राहणारी व्यक्ती २३ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझीटीव्ह आली होती. या व्यक्तीला मनपा आरोग्य विभागामार्फत होम आयसोलेशन करण्यात आले होते. तसेच राहत्या घरी याबाबतचे स्टिकर लावण्यात आले होते. मात्र सदर व्यक्ती होम आयसोलेशनचे नियम न पाळता बाहेर फिरत असल्याबाबतची तक्रार व फोटो प्रशासनाला प्राप्त झाले.  मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह अलगीकरणात आढळुन आला नाही तसेच घरी लावण्यात आलेले होम आयसोलेशनचे स्टीकर देखील सदर व्यक्तीने काढून टाकल्याचे आढळले.  त्यामुळे मनपा प्राथमीक आरोग्य केंद्र क्र. ७ च्या वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे ही संपुर्ण माहिती रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून यानंतर पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनीक धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य जाणीवपुर्वक केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच सदर व्यक्तीला कोव्हीड केअर सेंटर, वन अकादमी येथे पाठविण्यात आले आहे.
       प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची समज वारंवार मनपा प्रशासनाद्वारे देण्यात येत असुन पालन न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here