खासदार बाळू धानोरकरांच्या मध्यस्थीने लालपरी पुन्हा धावणार

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीतील चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. पगाराअभावी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. तातडीने पगार मिळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर कामगाराच्या हितासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बोलून  हा प्रश्न मार्गी लावणार आहे.  तोवर लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू द्या अशी विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली. त्यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर विश्वास ठेवत हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आता जिल्ह्यात लालपरी रस्त्यावर धावणार असल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.

लोकसभा क्षेत्राचे कर्तव्य दक्ष खासदार बाळू धानोरकर हे पुढे येत सध्या दिल्ली येथे अधिवेशनात असून देखील भ्रमणध्वनीच्या माध्यमातून त्यांनी कामगारांशी संवाद साधला. त्यावेळी संबंधित मंत्र्यासोबत बोलून लवकर याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, कामगार प्रतिनिधी रा. प चंद्रपूर मंगेशसिंग भास्करसिंग डांगे, विभागीय नियंत्रक पाटील, आगार व्यवस्थापक, सोहेल शेख, यासह कर्मचारी, कामगार नेते तसेच माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार यांची उपस्थिती होती.

मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हा काही काळासाठी एसटी सेवा बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यावर एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. त्याआधी एसटीचा मालवाहतुकीसाठी वापर करण्यात आला. त्यात एसटी चालक, वाहक, यांत्रिकी विभागासह अन्य विभागासह कर्तव्यावर होते. एसटी सेवा आता पूर्ववत सुरु झाली.

सध्या कोरोना संक्रमण काळ सुरु आहे. याही काळात एसटीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा देत आहेत. मात्र, याच कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. सुरवातीला तीन महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला होता. आता तीन महिन्यापासून त्यांना पगारच देण्यात आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्याचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहे. आता खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटणार असून हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here