आता कोव्हीड – 19 रुग्ण खाटांची माहिती मिळणार एका क्लिकवर

चंद्रपूर २३ सप्टेंबर – कोव्हीड 19 रुग्णांकरीता विविध उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णस्थितीची सहज माहिती उपलब्ध व्हावी तसेच कोव्हीड 19 बाधितांकरीता उपलब्ध असणा-या रुग्णालयांची माहिती आणि त्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी वापरात असलेल्या बेड्सची संख्या व उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता महापौर सौ राखी कंचर्लावार व महापालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या संकल्पनेतून “कोव्हीड 19 डॅशबोर्ड” उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी https://www.ccmcchandrapur.com/hospital/  या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
एखाद्या व्यक्तीचा स्वॅब टेस्टींग अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर  त्या रुग्णाला उपचारार्थ कुठे दाखल करावयाचे व त्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहे याबद्दलची माहिती या डॅशबोर्डव्दारे त्वरीत उपलब्ध होणार असून यामुळे कमीत कमी वेळेत रुग्णाला योग्य ठिकाणी दाखल करणे सोयीचे होणार आहे.
“कोव्हीड 19 डॅशबोर्ड” च्या मुख्यपृष्ठावर खाजगी तसेच शासकीय रुग्णालयाचे नाव, पत्ता, संबंधित व्यक्ती, संपर्क क्रमांक, सेंटर /हॉस्पिटलची बेड्स क्षमता, सद्यस्थितीत वापरात असलेल्या बेड्सची संख्या व रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या,नजीकच्या कालावधीत उपलब्ध होऊ शकणारे बेड्स तसेच डिस्चार्ज दिल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या दर्शविली जाणार आहे. ही आकडेवारी संबंधित रुग्णालयांद्वारे नियमितपणे दर १२ तासांनी अद्ययावत केली जाणार आहे. याकरीता शासकीय तसेच खाजगी सर्व रुग्णालयांना महानगरपालिकेतर्फे पत्र देऊन आकडेवारी दैनंदिन अद्ययावत करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
एकंदरीतच https://www.ccmcchandrapur.com/hospital/ या लिंकवर एका क्लिकव्दारे कोव्हीड 19 च्या माहितीचा डॅशबोर्ड नागरिकांसाठी खुला होणार असून त्यावर कोरोनाविषयक सद्यस्थितीतील आकडेवारी तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 वर उपचार करण्यासाठी उपलब्ध रुग्णालये व तेथील उपलब्ध बेड्सची संख्या सहजपणे कळणार असून याव्दारे नागरिकांना एक चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.
तरी नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करून चंद्रपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मास्कचा अनिवार्य वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापौर सौ राखी कंचर्लावार व महापालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या वतीने करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here