मेडीकल कॉलेज चंद्रपूर येथे ४० नर्सेस येत्‍या आठवडयात उपलब्‍ध होतील तर रिक्‍त पदे भरण्‍याबाबत प्राधान्‍याने कार्यवाही करणार – वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांचे आश्‍वासन

चंद्रपूर:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालय चंद्रपूर येथे ४० नर्सेस येत्‍या आठवडयात उपलब्‍ध करण्‍यात येणार असुन २०१८ मध्‍ये झालेल्‍या पदभरतीच्‍या माध्‍यमातुन या नर्सेसची निवड करण्‍यात आली आहे. त्‍याचप्रमाणे डॉक्‍टर्सची पदे भरण्‍याबाबत प्राधान्‍याने कार्यवाही करण्‍यात येत असुन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलयाच्‍या माध्‍यमातुन वर्ग ३ व ४ ची पदे भरण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत असल्‍याची माहीती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय यांनी दिली.
दिनांक १६ सप्‍टेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यलय रुग्‍णालय चंद्रपूर येथील रिक्‍त पदे भरण्‍याबाबत तसेच कोरोना काळात उत्‍तम आरोग्‍य सेवा पुरविण्‍याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विनंतीनुसार ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह चंद्रपूरचे खासदार बाळु धानोरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोरे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, चंद्रपूरच्‍या महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयएमएचे अध्‍यक्ष डॉ. माडूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थितीत होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आयसीयु बेडच्‍या संख्‍येत वाढ करण्‍याची मागणी केली. तसेच अर्थमंत्री पदाच्‍या काळात आपण एमआरआय मशीनसाठी १४ कोटी रु. निधी मंजुर केले होते. त्‍या मशीनच्‍या खरेदीच्‍या सद्यस्थितीतबाबत विचारणा केली. सिटीस्‍कॅन मशीन तातडीने उपलब्‍ध करण्‍याची मागणी केली. बल्‍लारपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्लय व रुग्‍णालयाचे उपकेंद्र करण्‍यात आले असुन त्‍याचे सशक्‍तीकरण करण्‍याची आवश्‍यकता आ. मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासी बहुल जिल्‍हा असुन मानवविकास निर्देशांकात मागे आहे. त्‍यामुळे या जिल्‍हयातील मेडीकल कॉलेजसाठी विशेष निधी उपलब्‍ध करत उत्‍तम आरोग्‍य सेवा पुरविण्‍याची मागणी त्‍यांनी केली. या रुग्‍णालयात डॉक्‍टर्स, नर्सेस आदींची ३७५ पदे रिक्‍त आहेत. सदर रिक्‍त पदे तातडीने भरावी. आवश्‍यक औषधी व इंजेक्‍शन्‍सचा पुरवठा तातडीने करावा, यासाठी सुटसुटीत पध्‍दत विकसीत करावी अशी मागणी त्‍यांनी केली. १ ऑक्‍टोबर पर्यंत १०२८३ इतकी रुग्‍ण संख्‍या वाढणार असल्‍याने अतिरिक्‍त हॉस्‍पीटल उपलब्‍ध करता येईल काय व त्‍यासाठी निधी कसा उपलब्‍ध करता येईल याबाबत नियोजन करण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. कोरोनाबाबात प्रतिबंध करताना इतर आजारांकडे दुर्लक्ष करण्‍यात येवु नये याबाबतही त्‍यांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना खा. बाळु धानोरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालयातील उणीवा दुर कराव्‍या तसेच जिल्‍हाधिकारी आणि अधिष्‍ठाता यांच्‍यात समन्‍वय राखुन रुग्‍णसेवेचे कर्तव्‍य पार पाडावे असे सुचविले. एमआरआय मशीन खरेदीसाठी हाफकिन या संस्‍थेकडे निधी वळता करण्‍यात आला असुन खरेदीची प्रक्रिया सुरु असल्‍याची माहीती अधिष्‍ठाता डॉ. मोरे यांनी दिली. स्‍त्री रुग्‍णालयात लवकरच सीटी स्‍कॅन मशील उपलब्‍ध करण्‍यात येणार असल्‍याचे डॉ. मोरे यांनी सांगीतले. ८५ टक्‍के प्रशासकीय पदे भरण्‍याची मान्‍यता वैद्यकीय शिक्षण विभागाला प्राप्‍त असुन पद भरतीबाबत कार्यवाही सुरु आहे. त्‍याच प्रमाणे कोविड-१९ च्‍या काळात बंधपत्रीत डॉक्‍टर्स व नर्सेस आवश्‍यकतेनुसार उपलब्‍ध करण्‍यात येईल असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here