

चंद्रपूर:घुग्गुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमीटेडचे राजीव रतन रूग्णालय तसेच गडचांदुर परिसरातील माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अॅन्ड टी या सिमेंट कंपन्याच्या रूगणालयांना कोवीड सेंटर म्हणुन मान्यता देण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे, जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
घुग्घुस शहरात तसेच लगतच्या परिसरात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्हयातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता शासकिय रूग्णालयांवर मोठा ताण पडत आहे. शासकिय रूग्णालयांमध्ये रूग्णांना बेडस् उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे घुग्घुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमीटेडच्या राजीव रतन रूग्णालयाला कोवीड सेंटर म्हणुन मान्यता मिळावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व जिल्हा परिषद सभापती सौ. नितु चौधरी यांनी आ. मुनगंटीवार यांचेकडे केली. यामाध्यमातुन घुग्घुस शहरातील तसेच लगतच्या परिसरातील रूग्णांसाठी योग्य सोय उपलब्ध होईल.
त्याचप्रमाणे कोरपना तालुक्यातील गडचांदुर परिसरात माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अॅन्ड टी या सिमेंट कंपन्याची रूग्णालये उपलब्ध आहेत. या रूग्णालयांना सुध्दा कोवीड सेंटर म्हणुन मान्यता दिल्यास जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यातील कोवीड रूग्णांना त्याठिकाणी उपचारार्थ योग्य सोय उपलब्ध् होईल व प्रशासनावरील ताणही कमी होईल. ही बाब लक्षात घेता घुग्घुस येथील वेस्टर्न कोलफिल्डस् लिमीटेडचे राजीव रतन रूग्णालय तसेच गडचांदुर परिसरातील माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अॅन्ड टी या सिमेंट कंपन्याच्या रूगणालयांना कोवीड सेंटर म्हणुन मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्याचप्रमाणे वेकोलि प्रशासन आणि माणिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि एल अॅन्ड टी या सिमेंट कंपन्यांच्या व्यवस्थापनाला सुध्दा त्यांनी पत्रे पाठविली आहे.