
चंद्रपूर : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे नुकतेच ‘चंद्रपुरातील समस्या व समाधान’ या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून प्रथम क्रमांक डाॅ. स्वप्नकुमार दास यांनी पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक मोहम्मद जिलानी व तृतीय क्रमांक पी. नायर आणि नुपूर राऊत यांनी संयुक्तपणे मिळविला आहे. रोशनी कजलीवाले, विशाल चांदेकर, अक्षम लोहकरे, पुनम ठोंबरे, हुड, निर्मला वर्मा, विनिता दीक्षित व उमेश्वर आत्राम प्रोत्साहनपर पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. सीबीएसएसद्वारा आयोजित या निबंध स्पर्धेत चंद्रपूर महानगरातील शिक्षक, डॉक्टर्स, व्यावसायिक, विधिज्ञ व सुशिक्षित जागरुक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत निबंधातून चंद्रपुरातील समस्या व समाधान यावर प्रकाश टाकला. शहरातील समस्या, वृक्षारोपण, जलसंवर्धन, वाहतूक समस्येवर अनेकांनी भर दिला. या निबंध स्पर्धेसंदर्भात बोलताना चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा यांनी सांगितले, सर्व स्पर्धकांनी निबंधांच्या माध्यमातून चंद्रपुरातील समस्या व समाधान यावर आपले मत मांडले असून, ते शासनस्तरावर पोहचविले जाणार आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाविदर्भ च्या संपादक कल्पनाताई पलीकुंडवार व ज्येष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार यांनी जबाबदारी सांभाळली. विजेत्या स्पर्धकांना लवकरच प्रमाणपत्र देवून पुरस्कृत केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.