
चंद्रपूर,१२ सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा कायम असून कोरोना जराही हटायचे नाव घेत नाही. मागील आठवड्यापासून दररोज जवळपास दोनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तोच जोर अद्यापही कायम आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात 315 रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5568 झाली आहे.कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर शहरात जनता कर्फ्यूचा आज तीसरा दिवस असून,जनता कर्फ्यू असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 3086 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 2416 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 3086 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 60 सह एकूण 66 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.