
चंद्रपूर,10 सप्टेंबर
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथे 10 ते 13 सप्टेंबर या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी व्यापारी, नागरिकांचा 100 टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते.शहरात गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी,लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रशासन, आदींनी पुढाकार घेत 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूची हाक दिली. त्यानुसार आज शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली असून मेडीकल, दवाखाने व काही अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यात आली नाही.जनता कर्फ्यू मुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. शहरातील प्रमुख चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.