चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी 76 कोटी रु निधीची तरतूद

चंद्रपूर:

चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील सैनिक शाळेसाठी विधिमंडळाच्या सन 2020 च्या दुसऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे 76 कोटी रु निधीची तरतूद करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात केलेल्या चर्चेदरम्यान श्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांद्वारे भरीव तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासन पूर्ण झाले असून सदर सैनिक शाळेसाठी 76 कोटी रु निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍यात भाजपाचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर प्रारंभीच्‍या काळात घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयापैकी प्रमुख निर्णय म्‍हणजे चंद्रपूरची सैनिकी शाळा. भारतात आजमितीला असणा-या 26 सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये पूर्ण झाली आहे. पहिली 6 व्या वर्गाची तुकडी जून 2019 पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास आली आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्‍या माध्‍यमातुनच आ. मुनगंटीवार यांना सैनिकी शाळेच्‍या स्‍थापनेची प्रेरणा मिळाली आहे. चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील 123 एकरांमधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी संग्रहालय देखील आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय आहे. ताडोबाच्या पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येते. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे देखील उभे राहत आहेत. सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात आल्या आहेत. सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे आहे. मैदान हे ऑलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टॅंक पासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून सदर सैनिक शाळेसाठी 76 कोटी रु निधीची भरीव तरतूद झाल्याने उर्वरित कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here