खाजगी पॅथोलॉजिस्टनी कोरोना चाचणीसाठी सहकार्य करावे

चंद्रपूर, दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे संपर्क साखळीतील कोरोना चाचण्या जास्त प्रमाणात करण्याची गरज आहे. शासकीय चाचणी प्रयोगशाळेची मर्यादा असल्यामुळे अँटिजेन चाचणी शासनाने सुरू केल्यात. पण तिथेही गर्दी होत आहे. त्यामुळे खाजगी प्रयोगशाळांनी  कोरोना अँटिजेन चाचण्या सुरू करण्यासाठी  पुढे यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी केले.

आज नियोजन भवन येथे शहरातील खाजगी पॅथोलॉजिस्ट, डॉक्टर व इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्याशी चर्चा करतांना पालकमंत्र्यानी कोरोनाच्या महामारीत सर्वांनी मिळून हा लढा लढण्यासाठी सहकार्याची अपेक्षा केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.

यावेळी डॉ. कोल्हे यांनी खाजगी चाचणी सुरू केल्यावर लोकांच्या तक्रारी वाढल्यात,  त्यामुळे टेस्टिंग बंद करावी लागली असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोरोना चाचणी करण्यासंदर्भात खाजगी प्रयोगशाळांना अधिकृत आदेश देण्यात येईल. लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्या प्रयोगशाळा या कामासाठी वापराव्यात. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चाचण्या वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या लोकांना रांगेत उभे राहणे शक्य नाही आणि जे थोडेफार पैसे खर्च करू शकतात त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे. त्यामुळे खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रयोगशाळेत येऊन चाचणी करणे सुद्धा ज्यांना शक्य नाही त्यांना घरी जाऊन सॅम्पल गोळा करून घेण्याची सुविधा सुद्धा आपण द्यावी. त्याचा अहवाल तात्काळ आरोग्य विभागाला देण्यात यावा असेही  श्री. वडेट्टीवार यांनी सांगीतले.

बायो मेडिकल कचऱ्याबाबतचा मुद्दा यावेळी डॉ.सुरभी मेहरा यांनी उपस्थित केला. यावर बायो मेडिकल कचरा उचलणाऱ्या एजन्सी मनमानीपणे दर आकारू शकत नाहीत. मनपा आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या बाबीमध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

त्याचबरोबर रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे खाजगी  रुग्णालयाच्या रुग्णवाहिका सुद्धा भाड्याने घेण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. शिवाय गृह अलगीकरण करण्यात येणाऱ्या रुग्णाला सर्व साहित्याची किट दिली जाईल. त्याचे दर एकसारखे असावेत म्हणून किट मधील साहित्य आणि त्याचे दर निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला डॉ.प्रमोद बांगडे, डॉ.ऋषिकेश कोल्हे, डॉ.सुरभी मेहरा, डॉ. बोबडे व अन्य पॅथोलॉजिस्ट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here