3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊनच्या परवानगी बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर : जिल्हाधिकारी

चंद्रपूर,दि.1 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या सुचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.
दिनांक 3 ते 8 सप्टेंबर 2020 पर्यंत आरोग्य सेवा संदर्भातील आस्थापना वगळून सर्व प्रकारचे दुकाने, किराणा दुकाने, सर्व व्यवसाय, आस्थापना या संपुर्णतः बंद राहतील. दिनांक 8 ते 12 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते जसे किराणा दुकाने, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, मास-मासे विक्री, पशुखाद्य इत्यादींच्या आस्थापना सुरू राहतील. इतर सर्व प्रकारचे दुकाने आणि आस्थापना बंद राहतील अशा परवानगी संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे.
त्यामुळे लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी. या कालावधीमध्ये नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे पालन करावे आणि प्रशासनाला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 763 वर पोहोचली आहे. यापैकी, उपचाराअंती 1 हजार 298 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 436 आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवे 216 बाधित पुढे आलेले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 96,  वरोरा, नागभीड व मुल येथील प्रत्येकी 6, सावली 29, राजुरा 20, बल्लारपूर 30, पोंभूर्णा 2, सिंदेवाही 5,भद्रावती 7, कोरपना, ब्रह्मपुरी व चिमूर येथील प्रत्येकी 3 असे एकूण 216 बाधितांचा समावेश आहे.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार 763 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 56 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 266 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 1 हजार 472 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 718 बाधित, 61 वर्षावरील 201 बाधित आहेत. तसेच 2 हजार 763 बाधितांपैकी 1 हजार 809 पुरुष तर 924 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
2 हजार 763 बाधितांपैकी जिल्ह्यातील 2 हजार 650 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 48 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 65 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here