ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायण तिवारी यांचे उपोषण तूर्तास स्थगित

चंद्रपूर:
येत्या 15 ऑगस्टपर्यंत ‘सराय’ची कोलोनियल पध्दतीने पूर्नबांधणी किंवा नुतनिकरणाचा निर्णय घेण्यात आला नाही, तर त्यानंतर कोणत्याही क्षणी आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायण तिवारी यांनी दिला होता. दरम्यान, सरायच्या संवर्धनासाठी नागरिकांचा स्वयंस्फूर्त गटही तयार झाला. विविध अधिकारी व नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. त्याचा परिपाक म्हणून अखेर महापौर राखी कंचर्लावार यांनी सरायला वाचविण्यासाठी लवकरच ठोस पाऊल उचलू, असे आश्वासन दिल्याने तिवारी यांचे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी कळविले आहे.
महापौर यांनी दिलेल्या आश्वासनपत्रात नमूद आहे की, कोरोनाकाळ संपल्यानंतर व मनपाची आर्थिक बाजू भक्कम झाल्यानंतर या वास्तूचे नुतनीकरण लवकरात लवकर करण्याचा आमचा मानस आहे. तसेच सरायच्या संवर्धनासाठी आयुक्त राजेश मोहिते हेही सकारात्मक असून, त्यांनी शिष्टमंडळाच्या विनंतीने सरायची पाहणी केली. तेे तिवारी यांना भेटले आणि उपोषण करू नये, अशी विनंती केली. शिष्टमंडळाने माजी मंत्री सुधीर मुनगंंटीवार यांचीही भेट घेतली. त्यांनीही महापौर यांचा याबाबत लक्ष घालण्याचे सूचना केली. खासदार बाळू धानोरकर यांची तर या कामासाठी लेखी पाठींबा दिला आहे.
पुरातत्व विभाग ज्या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे मुळ स्वरूप न बदलता पूनर्बांधणी किंवा नुतनिकरण करते, त्याच धर्तीवर ‘सराय’लाही वाचवावे, अशी मागणी चंद्रपुरातील नागरिक करीत आहेत. गत 30-35 वर्षांपासून यासाठी शासनदरबारी पाठपुरावाही केला जात आहे. परंतु, शासन व प्रशासनाने याची अद्याप दखल घेतलेली नाही, याबद्दल तिवारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
तब्बल 93 वर्षांचा वारसा सांगणारी महानगरातील सयार ही ऐतिहासिक इमारत एव्हाना शेवटची घटका मोजत आहे. या इमारतीचे छत कोसळले आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. भिंती तेवढ्या शाबूत आहेत. ‘सराय’ची डागडुजी करा आणि त्याचा उपयोग माहिती केंद्र किंवा मग संग्रहालय म्हणून करा किंवा कसाही उपयोग करा, पण हा ऐतिहासिक वारसा जपा होऽऽऽ, असे सातत्याने सांगत, येथील इतिहासाचे अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांनी यासाठी प्रदीर्घ लढा लढला आहे. मात्र, कुणीच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे एव्हाना त्यांनीही शस्त्र खाली ठेवले होते. अशावेळी वर्तमानपत्रांनी या ऐतिहासिक इमारतीच्या संवर्धनासाठी आवाज बुलंद केला. त्यास सहकार्य म्हणून सुज्ञ नागरिकांचे एक शिष्टमंडळही तयार झाले आहे. सोबतच सत्यनारायण तिवारी यांनीही उपोषणाचा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here